Tuesday, April 30, 2013

चाळीस एकरावर स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणी

सव्वा कोटी लिटरचे शेततळे, संगणकीय प्रणालीद्वारे ठिबक सिंचन, संगणकाद्वारेच विद्राव्य खतांचे व्यवस्थापन, स्वतंत्र हवामान केंद्र असे एखादे कृषी संशोधन केंद्र शोभावे अशी अत्याधुनिक यंत्रणा खेडगाव (ता. दिंडोरी) येथील प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शरद ढोकरे यांनी आपल्या शेतात उभी केली आहे. अत्याधुनिक व्यवस्थापन तंत्रामध्ये दर्जेदार द्राक्ष उत्पादनाचे गणित दडलेले आहे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका हा ऊस व द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध आहे. या दोन्ही नगदी पिकांत उच्चांकी उत्पादनाचे विक्रम येथील बहुतांश शेतकऱ्यांनी केले आहे. जगप्रसिद्ध वाघाड प्रकल्पाच्या पाण्यावर या पिकांचे सिंचन होते. तालुक्‍याच्या दक्षिण-पूर्व भागात पाण्याची चांगली सोय असल्याने पाण्याच्या वापराबाबत शेतकरी अजूनही जागरूक नाही. या पार्श्‍वभूमीवर मात्र खेडगाव येथील शरद ढोकरे यांनी पाण्याचे मोल ओळखून शेतीसाठी पाण्याचे काटेकोर नियोजन केले आहे. श्री. ढोकरे यांचे शालेय शिक्षण रूढ अर्थाने फक्त इयत्ता सातवीपर्यंत झाले आहे. मात्र द्राक्ष शेतीमधील त्यांचा अभ्यास इतरांना मार्गदर्शक ठरणारा आहे. याची प्रचिती बागेतील आधुनिक सिंचन प्रणाली आणि बागेचे व्यवस्थापन पाहिल्यावर येते. 

टॅंकरकडून शेततळ्याकडे..
पाण्याच्या उपलब्धतेबाबत सांगताना श्री. ढोकरे म्हणाले, की दिंडोरी तालुक्‍याच्या बहुतांश भागात वाघाड, पालखेड, करंजवण, पुनेगाव, तिसगाव या धरणांमुळे कालव्याच्या सिंचनाचे चांगले जाळे पसरलेले असले तरी खेडगाव परिसर मात्र पाण्यापासून वंचित राहिला आहे. सन 1990-91मध्ये येथील डोंगराळ भागात द्राक्ष बाग लागवड करण्याचे ठरविले, तेव्हा अनेक अडचणी आल्या. जमीन द्राक्षासाठी चांगली असली तरी पाण्याचा प्रश्‍न बिकट होता. त्या वेळी शेतजमिनीच्या उंच भागात टाकी उभारून, त्यात टॅंकरचे पाणी विकत घेऊन टाकले जात असे. सन 1995-96 या काळात यांच्यावर द्राक्ष बाग वाचविण्यासाठी टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली होती.अशा पद्धतीने तीन वर्षे द्राक्षवेली जगवल्या आहेत. 1995 ते 1998 या काळात दोन विहिरी, तीन बोअरवेल घेतल्या. द्राक्षाचे क्षेत्र आठ एकरांवरून वाढवीत 40 एकरांवर नेले. या स्थितीत पाणी पुरेना म्हणून तिसगाव धरणातून पाइपलाइन केली. शेताजवळ 160 फूट लांब, 105 फूट रुंद आणि साडेअठ्ठावीस फूट खोलीचे सव्वा कोटी लिटर पाणीक्षमतेचे तळे बनविले. काटेकोर पाणी व्यवस्थापनासाठी सन 2006 मध्ये पाणी व्यवस्थापनासाठी स्वयंचलित प्रणालीचा वापर सुरू केला. द्राक्ष शेती आणि बाजारपेठेच्या अभ्यासासाठी दक्षिण आफ्रिका, युरोप, इस्राईल, चीन या देशांचा मी दौरा केला आहे, त्यामुळे या देशातील प्रगत तंत्रज्ञानाची ओळख होत गेली. त्याचा फायदा द्राक्ष शेतीमध्ये होत आहे. इस्राईलमधील अत्याधुनिक सिंचन व्यवस्था व तंतोतंत पाणी व्यवस्थापन यंत्रणा मला आवडली. या प्रणालीचा अभ्यास करून मी शेतीमध्ये पाणीसाठवण तळ्याच्या बरोबरीने संगणकीय प्रणाली, फर्टिगेशन या इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर केला. सध्या माझ्याकडे थॉमसन (26 एकर), नानासाहेब पर्पल (दोन एकर), जम्बो (दोन एकर), विजय चमन (दोन एकर), फ्लेम (दोन एकर), टू-ए- क्‍लोन (चार एकर), फॅन्टसी (दोन एकर) या जातींची लागवड आहे. 

...असे आहे "हायटेक' व्यवस्थापन
राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक असलेले शरद ढोकरे यांचा सातत्याने द्राक्ष शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान शेतात वापरण्याकडे कल राहिला आहे. शेतातील सव्वा कोटी लिटर पाणीक्षमतेचे तळे, संगणकीय प्रणाली, पाणी शुद्धीकरण, नियंत्रक आदी यंत्रणा असलेली स्वतंत्र इमारत पाहणाऱ्याच्या नजरेत भरते. चाळीस एकर द्राक्ष बागेसाठी पाणी आणि खत व्यवस्थापनाबाबत माहिती देताना श्री. ढोकरे म्हणाले, की तळ्यातून पाच हॉर्स पॉवर च्या पंपाने पाइपलाइन संगणकीय प्रणाली व विद्राव्य खतांच्या टाक्‍यांना जोडलेली आहे. याच भागात सॅण्ड फिल्टर, डिस्क फिल्टर, वॉटर मीटर, फर्टिगेशन टॅंक जोडलेले आहेत. वेगवेगळ्या जातींनुसार 12 प्लॉटमध्ये शेतीची विभागणी केलेली आहे. प्रत्येक प्लॉटसाठी पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र कॉक ठेवला आहे. बागेला पाणी देण्यासाठी पंप सुरू केल्यानंतर पाणी प्रथम सॅण्ड फिल्टरमध्ये जाते. मातीचे कण, छोटे खडे यातून गाळले जातात. त्यानंतर डिस्क फिल्टरमध्ये पाणी येते. त्याचबरोबरीने या प्रणालीमध्ये क्षार विघटन यंत्रणा बसविलेली आहे. ज्यातून मुख्यत्वे पाण्यातील क्षार गाळले जातात. डिस्क फिल्टरलाच कंट्रोलर जोडलेला आहे. जो पाण्याच्या दाबावर नियंत्रण ठेवतो. याच्या पुढे वॉटर मीटर जोडले आहे. ज्यातून पाण्याची गती समजते. गतीत अडथळे आल्यास त्याचीही माहिती त्यातून मिळते. बागेस विद्राव्य खते देण्यासाठी "फर्टिगेशन टॅंक' याच प्रणालीला जोडलेला आहे. या टॅंकमध्ये फक्त जी खते द्यायची आहेत, ती टाकून ठेवणे आवश्‍यक असते. या खतांचे मिश्रण आणि पाण्याच्या प्रमाणाचा "प्रोग्रॅम' संगणकामार्फत देऊन कोणत्या प्लॉटला किती प्रमाणात खत द्यायचे याचे नियोजनही संगणकामार्फत केले जाते.

संगणकावरील "प्रोग्रॅमिंग' महत्त्वाचे...
पाणी आणि खत व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाइपलाइन, फिल्टर्स, फर्टिगेशन टॅंक या बाबी संगणकाशी जोडलेल्या असतात. या सर्वांना जोडणाऱ्या संगणकाच्या मॉनिटरवर ठराविक प्रोग्रॅम लिहून त्या पद्धतीने व्यवस्थापन केले जाते. संगणकावर सर्वप्रथम प्रोग्रॅम बनविला जातो. त्यात मेनू, प्रोग्रॅम, इरिगेशन, फर्टिगेशन आदी पर्याय दिले जातात. दिलेला प्रोग्रॅम एकदाच करण्याचा किंवा ठराविक अंतराने "रीपीट' करण्याचे पर्यायही उपलब्ध असतात. संगणकामार्फत लिटर पद्धत (व्हॉल्यूम बेस) आणि वेळ पद्धत (टाइम बेस) या दोन पद्धतींचा समन्वय साधून पाणी दिले जाते. यातील लिटर पद्धतीत बागेच्या ठराविक प्लॉटमधील एकूण झाडांची संख्या, ठिबकचा डिस्चार्ज यानुसार प्रत्येक तासाला पडणारे पाणी मोजले जाते. प्रति तासाला किती पाणी द्यावयाचे आहे, ते संगणकात नोंद केले जाते. दुसऱ्या प्रकारच्या वेळेवर आधारित पद्धतीत पाणी किती वेळ द्यायचे याची नोंद केलेली असते. यात "वॉटर मीटर'ची भूमिका महत्त्वाची असते. या मीटरच्या "डिस्प्ले'वर पाण्याचा "फ्लो' दिसतो. यात बदल झाला तर "हाय' किंवा "लो फ्लो' असा मेसेज येतो. शिवाय पाण्याच्या गळतीची, अडथळ्याची माहितीही यातून मिळते. अशावेळी पाण्याचा प्रवाह स्वयंचलित पद्धतीने बंद होतो, यामुळे पाणी व विद्राव्य खत वाया जात नाही. 

विद्राव्य खतांसाठी स्वयंचलित यंत्रणा विद्राव्य खतांच्या व्यवस्थापनाबाबत श्री. ढोकरे म्हणाले, की विद्राव्य खते देताना गरजेनुसार ठराविक बागेला खते देण्याचे नियोजन केले जाते. फर्टिगेशनच्या चार टाक्‍या संगणकीय प्रणालीद्वारे जोडल्या आहेत. संगणकात लिटर पाणी, खतांचे प्रमाण आणि क्षेत्र यांची माहिती संगणकामध्ये नोंदविलेली असते. पाण्याच्या प्रवाहाबरोबर विद्राव्य खते दिली जात असताना पाण्याचा सामू योग्य प्रमाणात टिकून राहतो. यातील तांत्रिक चुकीचे प्रमाण 0.1 यापेक्षा अधिक वाढत नाही, यावरून या प्रणालीची अचूकता लक्षात येते. याशिवाय प्रत्येक बागेसाठी वेगवेगळ्या वेळा ठरविण्यात आलेल्या आहेत. अशावेळी स्वयंचलित पद्धतीने बागा बदलताना बरोबर दोन सेकंद वेळ लागतो. याशिवाय बागेत लॅटरल, ड्रीपर यांची गुणवत्ताही उच्च दर्जाची आहे, त्यामुळे योग्य दाबाने योग्य प्रमाणात वेलीला पाणी मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या दुरुस्तीचा खर्चही अत्यल्प आहे. शेततळ्यासाठी सहा लाख रुपये, तर चाळीस एकरांवरील संपूर्ण संगणकीकृत पाणी व्यवस्थापनासाठी एकूण बारा लाख रुपये खर्च आला आहे. 

मजूरटंचाई वर केली मात
आधुनिक पाणी व्यवस्थापन पद्धतीकडे वळून श्री. ढोकरे यांना तीन वर्षे झाली आहेत. 2006पासून याबाबतचे नियोजन सुरू केले असताना 2007 मध्ये नवी पद्धत सुरू करण्यात आली. ऐन उत्पादनाच्या हंगामात भारनियमनाची समस्या वाढते, मजूरटंचाईच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे, मात्र या हायटेक पद्धतीच्या वापरामुळे श्री. ढोकरे यांची या दोन्ही प्रकारच्या समस्यांपासून सुटका झाली आहे. विद्राव्य खतांच्या वापरात चांगली बचत झाली.
पूर्वी पाणी नियोजनासाठी दहा मजूरही अपुरे ठरायचे. त्यात कामाचा दर्जाही साधारण असायचा. आता केवळ दोन मजूर चाळीस एकरांचे पाणी व्यवस्थापन व्यवस्थितपणे हाताळत असल्याचे ढोकरेंनी सांगितले. याशिवाय झाडाच्या गरजेनुसार नेमकेच पाणी देता येणे शक्‍य झाले. भारनियमनामुळे दिवसातील सर्वाधिक काळ वीजपुरवठा खंडित राहतो, अशा वेळी रात्री अपरात्रीही पाणी देणे शक्‍य होते.
: शरद ढोकरे, 9372235611

No comments:

Post a Comment