Monday, April 29, 2013

करा आडसाली ऊस लागवडीची पूर्वतयारी

आडसाली हंगामात लावलेले ऊस पीक हे जोमदार वाढते, कारण उगवणीपासूनच या पिकास अनुकूल हवामान मिळते. तसेच पीकवाढीच्या कालावधीत दोन पावसाळी हंगामाचा फायदा मिळतो. त्यामुळे सुरू हंगामाच्या दीडपट उत्पादन मिळते. आडसाली उसाचा कालावधी 16 ते 18 महिने असल्यामुळे जमिनीची निवड व पूर्वमशागतीला विशेष महत्त्व आहे. तेव्हा त्याची पूर्वतयारी वेळेत करणे आवश्‍यक आहे. 

ऊस उत्पादनाच्या दृष्टीने जमिनीची निवड आणि नियोजनाला अतिशय महत्त्व आहे. लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, एक ते दीड मीटर खोलीची, मध्यम काळी, 60 टक्केपेक्षा जास्त जलधारणाशक्ती असलेली तसेच सुपीक जमीन उसासाठी योग्य असते. जमिनीचा सामू 6.5 ते 8.5, क्षारांचे प्रमाण 0.5 टक्‍क्‍यापेक्षा कमी व चुनखडीचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आणि सेंद्रिय कर्ब किमान 0.5 टक्का असावा. 

जमिनीची पूर्वमशागत -
उसासाठी निवडलेल्या जमिनीची चांगली पूर्वमशागत करावी. पूर्वमशागतीमध्ये नांगरणी, ढेकळे फोडणे, कुळवणे, जमिनी सपाट करणे, सऱ्या काढणे, रान बांधणी करणे याचा समावेश होतो. पूर्वीचे पीक काढल्याबरोबर जमिनीची खोल नांगरट करावी. पहिल्या नांगरटीनंतर 15 ते 20 दिवसांनी दुसरी आडवी नांगरट करावी. नांगरणीमुळे जमीन मोकळी होऊन पाणी जमिनीत सहज मुरते, हवा खेळती राहते, पाण्याचा चांगला निचरा होतो, पूर्वीच्या पिकाचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन सेंद्रिय पदार्थांची भर पडते. नांगरणीनंतर जमीन उन्हात तापू द्यावी. त्यानंतर जमिनीत ढेकळे असल्यास कुळवाने चालवून फोडावीत. त्यामुळे सरी चांगली पडते. ऊस पिकाला समप्रमाणात पाणी मिळण्यासाठी जमीन समपातळीत करून घ्यावी. दुसऱ्या नांगरणीपूर्वी हेक्‍टरी 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत द्यावे. मध्यम प्रकारच्या जमिनीत एक मीटर आणि भारी जमिनीत 1.20 मीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात. जमीन सपाट असल्यास (0.3 टक्‍क्‍यापर्यंत उतार) 40 ते 60 मीटर अंतरावर आडवे पाट पाडून लांब सरी पद्धतीचा अवलंब करावा. पाण्याची बचत व ऊस पिकास जास्तीत जास्त सूर्यप्रकाश व खेळती हवा राहण्यासाठी पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. यासाठी रिजरच्या साह्याने 2.5 किंवा तीन फूट अंतरावर सलग सऱ्या पाडाव्यात. सलग दोन सऱ्यांत लागवड करून तिसरी सरी मोकळी ठेवावी. त्यामुळे 2.5 ते पाच फूट किंवा तीन ते सहा फूट अंतरावर जोडओळीची पट्टा पद्धतीने लागवड करणे सुलभ होते. ऊस लागणीपूर्वी सेंद्रिय खताचा दुसरा हप्ता हेक्‍टरी 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत सरीमध्ये टाकावे. कंपोस्ट/ शेणखत उपलब्ध नसल्यास लागवडीपूर्वी ताग/ धैंचा हिरवळीची पिके घेऊन पीक फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावीत. 

खत व्यवस्थापन - 
जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी आडसाली उसाला प्रति हेक्‍टरी अनुक्रमे 30 टन शेणखत अथवा कंपोस्ट खत लागवडीपूर्वी दुसऱ्या नांगरटीच्यावेळी अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्रा सरी सोडण्यापूर्वी द्यावी. शेणखत अथवा कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास ताग, धैंचा यांसारख्या हिरवळीच्या पिकांचा किंवा प्रेसमड केक हेक्‍टरी सहा टन किंवा गांडूळखत हेक्‍टरी पाच टन वापरावे. कंपोस्ट/ शेणखत उपलब्ध 
नसल्यास उन्हाळ्यात ताग/ धैंचा पीक घेऊन तो फुलावर येताच (45-50 दिवस) ट्रॅक्‍टरच्या साह्याने जमिनीत गाडावा. जमिनीस शेणखत/ कंपोस्ट खत अगर हिरवळीच्या खतामुळे सेंद्रिय पदार्थांची भर पडून सूक्ष्म जिवाणूंची वाढ भरपूर होऊन जमिनीची जलधारणा शक्ती 
वाढते. जमीन भुसभुशीत होते. 

शिफारशीत वाण - 
आडसाली ऊस लागणीचा योग्य कालावधी जुलै/ ऑगस्ट असून तोडणी पुढील वर्षाच्या नोव्हेंबर/ डिसेंबरमध्ये केली जाते. आडसाली ऊस पीक साधारणपणे 15 ते 17 महिने शेतात उभे असते. यासाठी मध्यम पक्व होणाऱ्या को-86032 (नीरा) व को.एम. 0265 (फुले 265) या वाणांची शिफारस करण्यात आली आहे. या वाणांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 

लागवडीसाठी बेण्याची निवड -
ऊस उत्पादनवाढीसाठी बेणे मळ्यातील ऊसच लागवडीसाठी वापरावा. या बेण्याचा वापर केल्याने ऊस उत्पादनात दहा टक्के वाढ होते. प्रथम शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे शिफारशीत वाणांची निवड करावी. त्यानंतर त्या वाणाच्या बियाण्याची उपलब्धता पाहावी. ऊस बेण्याची निवड करताना 
पुढील बाबी विचारात घ्याव्यात. 
1) सुधारित जातीचे शुद्ध व भेसळविरहित बेणे निवडावे. 
2) बेणे रसरशीत असावे, कांड्या लांब आणि जाड असाव्यात. 
3) कांड्यांची वाढ चांगली झालेली असावी. डोळे फुगीर असावे. 
4) बेणे रोग आणि कीडमुक्त असावे. 
5) 10 ते 11 महिने वयाचे बेणे असावे. बेणे ताजे असावे. 24 तासांच्या आत लागण करावी. याप्रमाणे आडसाली उसाची पूर्वतयारी केल्यास उसाची वेळेत लागवड होऊन बेण्याची उगवण चांगली होते. त्यामुळे उत्पन्नात निश्‍चितच वाढ होईल. 
--- 
संपर्क - 02169-265335 
(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment