Thursday, April 25, 2013

वांगी उत्पादनात ओलांडली "लक्ष्मण'रेषा

टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील लक्ष्मण देविदास सोनवणे यांनी आठ एकर क्षेत्रावर संकरित वांग्याची लागवड करून केवळ दीडच महिन्यात किफायतशीर उत्पन्न मिळविले आहे. चोख व्यवस्थापन, अपार कष्ट व जिद्दीच्या बळावर त्यांनी उत्पादनाची "लक्ष्मण'रेषा ओलांडली आहे. 

टेंभुर्णी (जि. सोलापूर) येथील लक्ष्मण देविदास सोनवणे यांचा कच्च्या चामड्यापासून पक्के चामडे बनविण्याचा व्यवसाय होता. या व्यवसायात त्यांनी कालांतराने बदल केला. बाजारपेठेचा अभ्यास करून वाद्य बनविण्याची कला त्यांनी आत्मसात केली. पक्के चामडे बाजारात विकण्यापेक्षा त्यापासून तबला, डग्गा, ढोलकी, मृदंग, हलगी ही चर्मवाद्ये बनविण्याचे काम सुरू केले. वाद्य बनविण्याकामी संपूर्ण परिवाराचा विशेष हातखंडा आहे. या वाद्यांना राज्यभरात मागणी आहे. सोनवणे यांचा पाच भावंडांचा परिवार असून, चार बंधूंचे कुटुंब एकत्रित आहे. सुमारे वीस सदस्यांच्या या एकत्रित परिवाराचे लक्ष्मणराव हे कुटुंबप्रमुख आहेत. वाद्यनिर्मितीच्या बरोबरीने त्यांनी शेतीकडेही तेवढेच लक्ष दिले आहे. 

यश-अपयशातून शेती केली यशस्वी ः 
शेतीमधील प्रगतीबाबत माहिती देताना लक्ष्मणराव म्हणाले, ""वाद्य बनविण्याच्या व्यवसायाबरोबरच शेतीची आवड असल्याने 2005 मध्ये 23 एकर जिरायती शेती विकत घेतली. त्यात पाण्याच्या सोयीसाठी दोन विहिरी खोदल्या. त्यांना चांगले पाणी लागले. सुरवातीला 2006 मध्ये दोन एकरांवर ऊस लावला होता; परंतु भारनियमन व इतर काही कारणांमुळे फारसे उत्पादन मिळाले नाही, त्यामुळे पीकबदल करून नंतर साडेसात एकरांवर मिरची लागवड केली. पिकाचे काटेकोर व्यवस्थापन केले. हिरवी व लाल मिरची विकून त्यातून सुमारे साडेआठ लाख रुपये उत्पन्न मिळाले. 2008 मध्ये पाच एकर क्षेत्रावर उघड्यावरील ढोबळी मिरची लागवडीचा प्रयोग केला होता; परंतु या पिकात तोटा झाला. त्याच वर्षी "ग्रॅंडनैन' जातीची केळी लावली; मात्र त्याचाही प्रयोग फसला. 2009 मध्ये केळी बाग काढून टाकली. आठ एकर क्षेत्रावर काकडी लागवड केली. त्यात मात्र चांगले यश मिळाले. काकडीला चांगला भाव मिळून त्यातून आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. आठ एकरांवर डाळिंब लावले आहे. त्यात गेल्या वर्षी आंतरपीक म्हणून साडेतीन एकर क्षेत्रावर वांगी लागवड केली होती. वांग्याला प्रति किलो 15 रुपयांपासून 38 रुपयांपर्यंत भाव मिळाला. एकूण साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकंदरीतच शेतीमध्ये भाजीपाला पिकांचा चांगला अनुभव आला. मार्केटचाही अभ्यास झाल्याने दरवर्षी काकडी व वांगी लागवड करण्याचा निर्णय घेतला.'' 

...असे असते लागवडीचे नियोजन ः 
पीक लागवडीबाबत श्री. सोनवणे म्हणाले, की उन्हाळ्यात काकडीचा खप जास्त असतो. मागणीप्रमाणे आवकही भरपूर असते, त्यामुळे भाव त्याप्रमाणातच मिळतो. मे महिन्यात लागवड केलेली काकडी जूनमध्ये सुरू होते, तोपर्यंत बाजारात उन्हाळी काकडीची आवक कमी झालेली असते. परिणामी या काकडीला चांगला भाव मिळतो. हे गणित लक्षात घेऊन मेच्या पहिल्या आठवड्यात काकडी लागवडीचे नियोजन करतो, तसेच साठ दिवसांचे काकडी पीक घेऊन जमिनीची पुन्हा मशागत करून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात वांगी लागवडीचे नियोजन करणेही सोपे होते. फेब्रुवारीपर्यंत वांगी पिकाच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिले जाते. पुढे मार्च ते मे दरम्यानच्या काळात रान विश्रांतीसाठी मोकळे ठेवले जाते. या कालावधीत वाद्य बनविणे व त्यांची विक्री याकडे लक्ष देता येते. 

वांगी लागवडीचे नियोजन ः 
वांगी लागवडीबाबत श्री. सोनवणे म्हणाले, की काकडी लागवडीसाठी तयार केलेल्या वाफ्यांत शेणखताचा चांगला वापर केलेला असतो, त्यामुळे याच वाफ्यांची चांगली मशागत करून त्यावर वांगी लागवड केली जाते. चालू वर्षी दोन ऑगस्टला रोपवाटिकेतून रोपे आणून आठ एकरांवर वांग्याची लागवड केली आहे. त्यासाठी प्रति रोप 55 पैसे याप्रमाणे रोपे घरपोच आणली. एकरी एक हजार आठशे रोपे लावली आहेत. लागवडीचे अंतर 7 x 3 फूट ठेवले आहे. काकडीला पाणी देण्यासाठी केलेल्या ठिबक सिंचनाद्वारेच वांग्यालाही पाणी दिले जाते. 

एक एकर वांगी लागवडीच्या नियोजनाबाबत श्री. सोनवणे म्हणाले, की रोपे लागवडीनंतर चार दिवसांनी प्रत्येकी 100 किलो 18ः46ः00, एमओपी, निंबोळी पेंड व सिंगल सुपर फॉस्फेट यांची पहिली मात्रा दिली. त्यानंतर रोपांच्या वाढीसाठी पहिला महिनाभर दररोज एक किलो 19ः19ः19 व फुटव्यांसाठी एक किलो 12ः61 ठिबकद्वारे देण्यात आले. 
फुलोरा आल्यानंतर फुलगळ होऊ नये, फळधारणा चांगली व्हावी, योग्य प्रमाणात फुटवे यावेत, फळांना चमक येण्यासाठी 18ः46ः00, म्युरेट ऑफ पोटॅश, निंबोळी पेंड, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत प्रमाणात वापर केला. रोपे एक महिन्याची झाल्यावर शेंडेअळी, फळ पोखरणारी अळी, पानांतील रस शोषणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणे फवारण्या केल्या. वांग्याच्या व्यवस्थापनात प्रशांत कुंभार यांचेही मार्गदर्शन मिळते.

साधारणपणे 15 ऑक्‍टोबरला वांग्याची तोड सुरू झाली. आठवड्यातून दोन तोडे होतात. आठ एकरांतून दर आठ दिवसाला सुमारे 12 टन माल निघतो. आतापर्यंत 60 टन उत्पादन मिळाले आहे, त्यातून 12 लाख रुपये उत्पन्न मिळाले. वांगी काढणी अजून सुरू असून, फेब्रुवारीपर्यंत आणखी 100 टन उत्पादन मिळेल. भाव कमी झाला तरीही 20 लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा सोनवणे यांनी व्यक्त केली. 

प्रतवारी, पॅकिंगवर दिला भर ः 
प्रतवारी केलेल्या मालाला चांगला भाव मिळतो असे लक्ष्मणराव यांच्या लक्षात आले. तेव्हापासून त्यांनी प्रतवारी तसेच पॅकिंग यावर जास्त भर दिला. शेतातून वांगी तोडल्यावर लगेच त्यांची प्रतवारी केली जाते. त्यात सुमारे 80 ग्रॅम वजनाची फळे एक नंबरच्या क्रेटमध्ये, तर मध्यम आकाराचे वांगे दोन नंबरच्या क्रेटमध्ये आणि तोडायचे चुकून राहिलेले वांगे मोठे होते, ते तीन नंबरच्या क्रेटमध्ये ठेवले जाते. भरितासाठी मोठ्या वांग्यांना मागणी मिळत असल्याचे श्री. सोनवणे यांनी सांगितले. 

"चमक-धमक' हेच मार्केटिंगचे तंत्र ः 
"चमक-धमक' असलेल्या मालाकडे ग्राहकांचा ओढा असतो, त्यास चांगला भाव मिळतो. मार्केटिंगचे हेच तंत्र सोनवणे यांनी वापरले आहे. प्रतवारी व पॅकिंग केलेला माल मुंबईच्या वाशी येथील बाजारपेठ पाठविला जातो. एका बॉक्‍समध्ये सुमारे 58 ते 60 किलो माल असतो. बॉक्‍स पॅकिंग करण्यासाठी शेतातच छोटेखानी पॅकिंग शेड उभारले आहे. यामध्ये प्रतवारी केलेल्या मालाचे वजन करून बॉक्‍स भरले जातात. भरलेले बॉक्‍स आवळपट्टीने आवळले जातात, त्यावर शेतकऱ्याचे नाव व .............वकल नंबर लिहिला जातो. हा माल भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून मुंबईला पाठविला जातो, त्यासाठी प्रति बॉक्‍स 100 रुपये भाडे आकारले जाते. बॉक्‍स पॅकिंग केल्यामुळे वांगी ताजी व टवटवीत राहतात. देठांना देठ घासत नाहीत. हवाबंद असल्यामुळे लवकर सुकत नाही. त्यामुळे इतरांपेक्षा या वांग्यांना नेहमीच जास्त भाव मिळतो, असा सोनवणे यांचा अनुभव आहे. 
एक नंबरच्या वांग्याला आतापर्यंत सर्वांत जास्त प्रति किलो सुमारे 26 ते 27 रुपये भाव मिळाला. दोन नंबरच्या वांग्याला 16 ते 17 रुपये, तर तीन नंबरच्या वांग्याला सहा ते सात रुपये प्रति किलो भाव मिळाला आहे. बाजारात मालाची आवक वाढल्याने आता थोडे भाव कमी झाले आहेत. नाशिकहून पोत्यातून येणाऱ्या वांग्यांना प्रति किलो सहा रुपये, तर तुलनेने बॉक्‍समधील वांग्यांना 12 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. गुणवत्तेला प्राधान्य दिल्यामुळे बाजारपेठेत माल बॉक्‍समधून न फोडताच पुढे पाठविला जातो. व्यापाऱ्यांचा एवढा विश्‍वास सोनवणे यांनी संपादन केला आहे. 

एकत्रित कुटुंबाचा फायदा ः 
एकत्रित कुटुंबाचा चांगला फायदा होतो असे सोनवणे सांगतात. मजूर कामावर येण्याच्या अगोदर घरातील मंडळी शेतीकामाला सुरवात करतात. यामध्ये लक्ष्मण यांची पत्नी सौ. सुरेखा, भास्कर व सौ. माधवी, प्रकाश व सौ. सुशीला, शिवदास व सौ. अरुणा यांच्याबरोबरीने मुले नीलेश, सोमनाथ, सूरज, रोहित, दयानंद, वैभव, दिनेश, राहुल आणि कु. स्वाती, कु. पूजा, कु. आरती, कु. पल्लवी या मुलींची शेतातील खुरपणी, पाणी देणे, जनावरांना गवत काढणे, मजुरांवर देखरेख, वांगी तोडणे, प्रतवारी करणे, पॅकिंग करणे या कामी खूप मदत होते. मजुरांची वेळ संपल्यावर उर्वरित कामे घरची मंडळी करतात. मुले व मुली शाळा-कॉलेज व अभ्यास करून उरलेल्या वेळेत शेतीकामात लक्ष घालतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूरखर्चात बचत होते. 

जमा-खर्चाचा ताळमेळ (एकरी) ः 
रोपे (1,800) - 990 रुपये, लागवड - सहा हजार रुपये, खते - 11 हजार तीनशे रुपये, फवारणी - आठ हजार रुपये, पॅकिंग बॉक्‍स पॅकिंग पट्टीसह - आठ हजार सातशे पन्नास रुपये, मजूर (काढणीसाठी) - 10,560 रुपये, वाहतूक - 12 हजार 500 रुपये. एकूण 58 हजार 100 रुपये. 
आतापर्यंत प्रति एकरी एक लाख पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यातून 58 हजार 100 रुपये खर्च वजा जाता एकरी 91 हजार 900 रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. 
संपर्क ः 
लक्ष्मण सोनवणे - 9422384412

No comments:

Post a Comment