Monday, April 22, 2013

बटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...

बटाटा लागवड १५ सप्टेंबर ते १५ ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण करावी, त्यासाठी शिफारशीत जातींची निवड, योग्य खत व्यवस्थापन, तसेच वेळेत पाणीपुरवठा याकडे लक्ष द्यावे. योग्य वेळी लागवड केल्यास अपेक्षित उत्पादन मिळण्यास मदत होते.

डॉ. देवीकांत देशमुख
बटाटे चांगले पोसण्यासाठी थंड हवामान आवश्‍यक असते. तापमान १८ ते २१ अंश से. अनुकूल असते. दिवसाचे तापमान २० ते २५ अंश से. राहिल्यास उत्पादनवाढीस मदत होते. कमी पावसाच्या भागात बटाट्याची शेती चांगली करता येते. कंदवर्गीय बटाट्यात मॅग्नेशिअम, सोडिअम आणि पोटॅशिअम इ. खनिजे, तसेच "क' आणि "ब' ही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे रोजच्या आहारात बटाट्याचा वापर असायला हवा. 

बियाणे २.५ ते चार सें.मी. आकाराचे व २५ ते ४० ग्रॅम वजनाचे असावे. प्रति हेक्‍टरी २५ ते ३० क्विंटल बियाणे वापरावे. लागवडीच्या आधी आठ ते दहा दिवसांपूर्वी शीतगृहातून बेण्याचे बटाटे काढून कोंब दिसू लागेपर्यंत सावलीत पसरून ठेवावेत. उन्हात बेणे सुकण्याची शक्‍यता असते. बेण्याला शीतगृहात ठेवण्याअगोदर प्रक्रिया केलेली नसेल, तर बेण्यातून कोंब दिसण्याअगोदर प्रक्रिया करून घेणे आवश्‍यक आहे. प्रक्रिया केलेले बेणे सावलीत पसरून ठेवावे. कोंब दिसू लागताच बेणे लागवडीसाठी वापरल्यास उगवणीवर परिणाम होतो. बेणे (बटाट्याच्या फोडी) प्रक्रियेसाठी १.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून बियाणे बुडवून नंतर लागवड करावी.

खतांचे प्रमाण ः 
जमिनीच्या पूर्वमशागतीच्या वेळी हेक्‍टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. पिकाला १००-१२० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८०-१०० किलो पालाश प्रति हेक्‍टरी देणे आवश्‍यक आहे. त्यापैकी अर्धे नत्र, स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे व राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी सरीत टाकून नंतर मातीची भर द्यावी.

लागवड पद्धती व वेळ ः
लागवड १५ सप्टेंबर ते १५ ऑक्‍टोबरपर्यंत करावी. लागवडीसाठी ४५ ते ५० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून सरीमध्ये १५-२० सें.मी. अंतरावर व पाच-सहा सें.मी. खोलीवर लागवड करावी. ४५ १५ सें.मी. व ५० २० सें.मी. या दोन्ही अंतर पद्धती योग्य आहेत.

पाणी व्यवस्थापन ः 
लागवडीनंतर पिकाला लगेच हलके पाणी द्यावे. त्यानंतर चार ते सात दिवसांनी पाणी द्यावे. पाणी देताना वरंबे २/३ पाण्यात बुडतील आणि जमीन ओलसर राहील अशा प्रकारे द्यावे.

आंतरमशागत व मातीची भर देणे ः 
लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे व राहिलेली खताची मात्रा देऊन मातीची भर द्यावी. दुसऱ्यांदा मातीची भर ५५-६० दिवसांत द्यावी.

लागवडीचा खर्च व उत्पादन ः 
प्रति हेक्‍टरी लागवड खर्च ः सरासरी रुपये ४५ हजार ते ५० हजार
प्रति हेक्‍टरी उत्पादन ः सरासरी २०० क्विंटल

०२४६२ - २७०११४, २७०११५
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड येथे कार्यक्रम समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.)

सुधारित जाती ः 
कुफरी चंद्रमुखी ः ही उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात घेण्यात येणारी प्रमुख जात आहे. या जातीचे बटाटे अंडाकृती, पांढरे व आकर्षक रंगाचे असतात. साठवणुकीत जास्त काळ टिकतात. ही जात ७० ते ७५ दिवसांत तयार होते आणि उत्पादन सरासरी २०० ते २५० क्विंटल प्रति हेक्‍टर मिळते.
कुफरी जवाहर ः ही जात ७५ - ८० दिवसांत तयार होते. या जातीची शिफारस पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, गुजरात व कर्नाटक राज्यासाठी केली आहे. या जातीचे बटाटे पांढरे, अंडाकृती व मध्यम आकाराचे असतात. साठवणुकीत जास्त काळ टिकतात, तसेच करपा व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो. या जातीचे रोपटे सरळ उभे वाढत असल्यामुळे सऱ्यांद्वारे बटाट्याची काढणी सहज केली जाऊ शकते. प्रति हेक्‍टरी २५० ते ३१० क्विंटल उत्पादन मिळते.
कुफरी अशोका ः ही लवकर तयार होणारी जात असून, ७५ ते ८० दिवसांत तयार होते. या जातीची पूर्वी उत्तर प्रदेश, बिहार व पश्‍चिम बंगालच्या मैदानी प्रदेशासाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीचे रोपटे मध्यम ते उंच पसरणारे आहे. बटाटे आकाराने मोठे असतात. या जातीपासून कुफरी चंद्रमुखीपेक्षा २५ ते ३० टक्के अधिक उत्पादन मिळते.
याशिवाय कुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी सिंधुरी या जातीही लागवडीसाठी उत्तम आहेत.

1 comment: