Tuesday, April 30, 2013

चाळीस एकरावर स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणी

सव्वा कोटी लिटरचे शेततळे, संगणकीय प्रणालीद्वारे ठिबक सिंचन, संगणकाद्वारेच विद्राव्य खतांचे व्यवस्थापन, स्वतंत्र हवामान केंद्र असे एखादे कृषी संशोधन केंद्र शोभावे अशी अत्याधुनिक यंत्रणा खेडगाव (ता. दिंडोरी) येथील प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शरद ढोकरे यांनी आपल्या शेतात उभी केली आहे. अत्याधुनिक व्यवस्थापन तंत्रामध्ये दर्जेदार द्राक्ष उत्पादनाचे गणित दडलेले आहे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका हा ऊस व द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध आहे. या दोन्ही नगदी पिकांत उच्चांकी उत्पादनाचे विक्रम येथील बहुतांश शेतकऱ्यांनी केले आहे. जगप्रसिद्ध वाघाड प्रकल्पाच्या पाण्यावर या पिकांचे सिंचन होते. तालुक्‍याच्या दक्षिण-पूर्व भागात पाण्याची चांगली सोय असल्याने पाण्याच्या वापराबाबत शेतकरी अजूनही जागरूक नाही. या पार्श्‍वभूमीवर मात्र खेडगाव येथील शरद ढोकरे यांनी पाण्याचे मोल ओळखून शेतीसाठी पाण्याचे काटेकोर नियोजन केले आहे. श्री. ढोकरे यांचे शालेय शिक्षण रूढ अर्थाने फक्त इयत्ता सातवीपर्यंत झाले आहे. मात्र द्राक्ष शेतीमधील त्यांचा अभ्यास इतरांना मार्गदर्शक ठरणारा आहे. याची प्रचिती बागेतील आधुनिक सिंचन प्रणाली आणि बागेचे व्यवस्थापन पाहिल्यावर येते. 

टॅंकरकडून शेततळ्याकडे..
पाण्याच्या उपलब्धतेबाबत सांगताना श्री. ढोकरे म्हणाले, की दिंडोरी तालुक्‍याच्या बहुतांश भागात वाघाड, पालखेड, करंजवण, पुनेगाव, तिसगाव या धरणांमुळे कालव्याच्या सिंचनाचे चांगले जाळे पसरलेले असले तरी खेडगाव परिसर मात्र पाण्यापासून वंचित राहिला आहे. सन 1990-91मध्ये येथील डोंगराळ भागात द्राक्ष बाग लागवड करण्याचे ठरविले, तेव्हा अनेक अडचणी आल्या. जमीन द्राक्षासाठी चांगली असली तरी पाण्याचा प्रश्‍न बिकट होता. त्या वेळी शेतजमिनीच्या उंच भागात टाकी उभारून, त्यात टॅंकरचे पाणी विकत घेऊन टाकले जात असे. सन 1995-96 या काळात यांच्यावर द्राक्ष बाग वाचविण्यासाठी टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली होती.अशा पद्धतीने तीन वर्षे द्राक्षवेली जगवल्या आहेत. 1995 ते 1998 या काळात दोन विहिरी, तीन बोअरवेल घेतल्या. द्राक्षाचे क्षेत्र आठ एकरांवरून वाढवीत 40 एकरांवर नेले. या स्थितीत पाणी पुरेना म्हणून तिसगाव धरणातून पाइपलाइन केली. शेताजवळ 160 फूट लांब, 105 फूट रुंद आणि साडेअठ्ठावीस फूट खोलीचे सव्वा कोटी लिटर पाणीक्षमतेचे तळे बनविले. काटेकोर पाणी व्यवस्थापनासाठी सन 2006 मध्ये पाणी व्यवस्थापनासाठी स्वयंचलित प्रणालीचा वापर सुरू केला. द्राक्ष शेती आणि बाजारपेठेच्या अभ्यासासाठी दक्षिण आफ्रिका, युरोप, इस्राईल, चीन या देशांचा मी दौरा केला आहे, त्यामुळे या देशातील प्रगत तंत्रज्ञानाची ओळख होत गेली. त्याचा फायदा द्राक्ष शेतीमध्ये होत आहे. इस्राईलमधील अत्याधुनिक सिंचन व्यवस्था व तंतोतंत पाणी व्यवस्थापन यंत्रणा मला आवडली. या प्रणालीचा अभ्यास करून मी शेतीमध्ये पाणीसाठवण तळ्याच्या बरोबरीने संगणकीय प्रणाली, फर्टिगेशन या इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर केला. सध्या माझ्याकडे थॉमसन (26 एकर), नानासाहेब पर्पल (दोन एकर), जम्बो (दोन एकर), विजय चमन (दोन एकर), फ्लेम (दोन एकर), टू-ए- क्‍लोन (चार एकर), फॅन्टसी (दोन एकर) या जातींची लागवड आहे. 

...असे आहे "हायटेक' व्यवस्थापन
राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक असलेले शरद ढोकरे यांचा सातत्याने द्राक्ष शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान शेतात वापरण्याकडे कल राहिला आहे. शेतातील सव्वा कोटी लिटर पाणीक्षमतेचे तळे, संगणकीय प्रणाली, पाणी शुद्धीकरण, नियंत्रक आदी यंत्रणा असलेली स्वतंत्र इमारत पाहणाऱ्याच्या नजरेत भरते. चाळीस एकर द्राक्ष बागेसाठी पाणी आणि खत व्यवस्थापनाबाबत माहिती देताना श्री. ढोकरे म्हणाले, की तळ्यातून पाच हॉर्स पॉवर च्या पंपाने पाइपलाइन संगणकीय प्रणाली व विद्राव्य खतांच्या टाक्‍यांना जोडलेली आहे. याच भागात सॅण्ड फिल्टर, डिस्क फिल्टर, वॉटर मीटर, फर्टिगेशन टॅंक जोडलेले आहेत. वेगवेगळ्या जातींनुसार 12 प्लॉटमध्ये शेतीची विभागणी केलेली आहे. प्रत्येक प्लॉटसाठी पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र कॉक ठेवला आहे. बागेला पाणी देण्यासाठी पंप सुरू केल्यानंतर पाणी प्रथम सॅण्ड फिल्टरमध्ये जाते. मातीचे कण, छोटे खडे यातून गाळले जातात. त्यानंतर डिस्क फिल्टरमध्ये पाणी येते. त्याचबरोबरीने या प्रणालीमध्ये क्षार विघटन यंत्रणा बसविलेली आहे. ज्यातून मुख्यत्वे पाण्यातील क्षार गाळले जातात. डिस्क फिल्टरलाच कंट्रोलर जोडलेला आहे. जो पाण्याच्या दाबावर नियंत्रण ठेवतो. याच्या पुढे वॉटर मीटर जोडले आहे. ज्यातून पाण्याची गती समजते. गतीत अडथळे आल्यास त्याचीही माहिती त्यातून मिळते. बागेस विद्राव्य खते देण्यासाठी "फर्टिगेशन टॅंक' याच प्रणालीला जोडलेला आहे. या टॅंकमध्ये फक्त जी खते द्यायची आहेत, ती टाकून ठेवणे आवश्‍यक असते. या खतांचे मिश्रण आणि पाण्याच्या प्रमाणाचा "प्रोग्रॅम' संगणकामार्फत देऊन कोणत्या प्लॉटला किती प्रमाणात खत द्यायचे याचे नियोजनही संगणकामार्फत केले जाते.

संगणकावरील "प्रोग्रॅमिंग' महत्त्वाचे...
पाणी आणि खत व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाइपलाइन, फिल्टर्स, फर्टिगेशन टॅंक या बाबी संगणकाशी जोडलेल्या असतात. या सर्वांना जोडणाऱ्या संगणकाच्या मॉनिटरवर ठराविक प्रोग्रॅम लिहून त्या पद्धतीने व्यवस्थापन केले जाते. संगणकावर सर्वप्रथम प्रोग्रॅम बनविला जातो. त्यात मेनू, प्रोग्रॅम, इरिगेशन, फर्टिगेशन आदी पर्याय दिले जातात. दिलेला प्रोग्रॅम एकदाच करण्याचा किंवा ठराविक अंतराने "रीपीट' करण्याचे पर्यायही उपलब्ध असतात. संगणकामार्फत लिटर पद्धत (व्हॉल्यूम बेस) आणि वेळ पद्धत (टाइम बेस) या दोन पद्धतींचा समन्वय साधून पाणी दिले जाते. यातील लिटर पद्धतीत बागेच्या ठराविक प्लॉटमधील एकूण झाडांची संख्या, ठिबकचा डिस्चार्ज यानुसार प्रत्येक तासाला पडणारे पाणी मोजले जाते. प्रति तासाला किती पाणी द्यावयाचे आहे, ते संगणकात नोंद केले जाते. दुसऱ्या प्रकारच्या वेळेवर आधारित पद्धतीत पाणी किती वेळ द्यायचे याची नोंद केलेली असते. यात "वॉटर मीटर'ची भूमिका महत्त्वाची असते. या मीटरच्या "डिस्प्ले'वर पाण्याचा "फ्लो' दिसतो. यात बदल झाला तर "हाय' किंवा "लो फ्लो' असा मेसेज येतो. शिवाय पाण्याच्या गळतीची, अडथळ्याची माहितीही यातून मिळते. अशावेळी पाण्याचा प्रवाह स्वयंचलित पद्धतीने बंद होतो, यामुळे पाणी व विद्राव्य खत वाया जात नाही. 

विद्राव्य खतांसाठी स्वयंचलित यंत्रणा विद्राव्य खतांच्या व्यवस्थापनाबाबत श्री. ढोकरे म्हणाले, की विद्राव्य खते देताना गरजेनुसार ठराविक बागेला खते देण्याचे नियोजन केले जाते. फर्टिगेशनच्या चार टाक्‍या संगणकीय प्रणालीद्वारे जोडल्या आहेत. संगणकात लिटर पाणी, खतांचे प्रमाण आणि क्षेत्र यांची माहिती संगणकामध्ये नोंदविलेली असते. पाण्याच्या प्रवाहाबरोबर विद्राव्य खते दिली जात असताना पाण्याचा सामू योग्य प्रमाणात टिकून राहतो. यातील तांत्रिक चुकीचे प्रमाण 0.1 यापेक्षा अधिक वाढत नाही, यावरून या प्रणालीची अचूकता लक्षात येते. याशिवाय प्रत्येक बागेसाठी वेगवेगळ्या वेळा ठरविण्यात आलेल्या आहेत. अशावेळी स्वयंचलित पद्धतीने बागा बदलताना बरोबर दोन सेकंद वेळ लागतो. याशिवाय बागेत लॅटरल, ड्रीपर यांची गुणवत्ताही उच्च दर्जाची आहे, त्यामुळे योग्य दाबाने योग्य प्रमाणात वेलीला पाणी मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या दुरुस्तीचा खर्चही अत्यल्प आहे. शेततळ्यासाठी सहा लाख रुपये, तर चाळीस एकरांवरील संपूर्ण संगणकीकृत पाणी व्यवस्थापनासाठी एकूण बारा लाख रुपये खर्च आला आहे. 

मजूरटंचाई वर केली मात
आधुनिक पाणी व्यवस्थापन पद्धतीकडे वळून श्री. ढोकरे यांना तीन वर्षे झाली आहेत. 2006पासून याबाबतचे नियोजन सुरू केले असताना 2007 मध्ये नवी पद्धत सुरू करण्यात आली. ऐन उत्पादनाच्या हंगामात भारनियमनाची समस्या वाढते, मजूरटंचाईच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे, मात्र या हायटेक पद्धतीच्या वापरामुळे श्री. ढोकरे यांची या दोन्ही प्रकारच्या समस्यांपासून सुटका झाली आहे. विद्राव्य खतांच्या वापरात चांगली बचत झाली.
पूर्वी पाणी नियोजनासाठी दहा मजूरही अपुरे ठरायचे. त्यात कामाचा दर्जाही साधारण असायचा. आता केवळ दोन मजूर चाळीस एकरांचे पाणी व्यवस्थापन व्यवस्थितपणे हाताळत असल्याचे ढोकरेंनी सांगितले. याशिवाय झाडाच्या गरजेनुसार नेमकेच पाणी देता येणे शक्‍य झाले. भारनियमनामुळे दिवसातील सर्वाधिक काळ वीजपुरवठा खंडित राहतो, अशा वेळी रात्री अपरात्रीही पाणी देणे शक्‍य होते.
: शरद ढोकरे, 9372235611

कमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती

प्रयोगशील शेतकरी शेखर पाटणे यांचा प्रयोग वेलंग (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील प्रयोगशील शेतकरी शेखर पाटणे यांनी ऊस लागवड खर्च कमी करण्यासाठी रोपेनिर्मितीची सोपी पद्धत विकसित केली. गरजेतून विकसित केलेली कमी खर्चाची ही रोपवाटिका निश्‍चितच फायदेशीर ठरणारी आहे. अमित गद्रे 
ऊस लागवड रोप पद्धतीने केल्यास 100 टक्के क्षेत्रावर उगवण पूर्ण होऊन उत्पादनात वाढ मिळते. सध्याची पाणीटंचाई, लागवड खर्चात बचत करण्यासाठी वेलंग येथील शेखर पाटणे यांनी स्वकल्पनेतून गरजेइतक्‍या ऊस रोपेनिर्मितीला सुरवात केली. ते म्हणाले, की मी एक डोळा पद्धतीने लागवड करतो. मला ट्रे किंवा पिशवीतील रोपांचा खर्च परवडत नव्हता. उपाय शोधताना खतांच्या पोत्यांच्या पट्ट्यांची कल्पना सुचली. त्यावर रोपे तयार केली तर मुळे जमिनीत घुसण्यास प्रतिबंध होऊन पट्टीवर मुळांची वाढ नियंत्रणात राहते हे लक्षात आले. पहिला प्रयोग यशस्वी ठरला. त्यानंतर या वर्षी 30 गुंठ्यांवरील लागवडीसाठी माझ्या पद्धतीने रोपे तयार करून लागवड केली. 

पाटणे यांनी सांगितले रोपवाटिकेचे तंत्र - माझे लागवड क्षेत्र 30 गुंठे असले तरी पहिल्याच प्रयोगात एक एकरासाठी लागणारी सहा हजार रोपे तयार केली. नेहमी गरजेपेक्षा 20 टक्के जास्त कांड्या लावाव्यात. 
- सप्टेंबरमध्ये मशागतीनंतर तीन फूट अंतराने सरी. लावणीच्या दोन सरी सोडून तिसऱ्या मोकळ्या सरीत रोपे तयार करण्याचे नियोजन. 
-- रोपेनिर्मितीसाठी सरीत पट्ट्या पसरण्यासाठी 50 पोती लागली. एक एकर लागवडीसाठी दोन गुंठे क्षेत्र लागले. प्रत्येकी 100 फूट लांब खताच्या पोत्याच्या पट्ट्या अंथरल्या. एका पोत्यापासून 15 फूट अंतराची पट्टी तयार होते. 
- पट्टीच्या कडा सरीच्या बगलेतील मातीने बुजविल्या. पट्टीवर दोन बोट जाडीचा मातीचा थर दिला. त्यात पुरेसे शेणखत, क्‍लोरऍन्ट्रानिलीप्रोल (दाणेदार) व डीएपी मिसळून एक डोळ्याची कांडी लागवड केली. 
- फुले-265 जातीचे दहा महिने वयाचे प्रमाणित बेणे निवडले. 
- त्यानंतर बेणेप्रक्रिया 

रोपेनिर्मिती - - बेणेप्रक्रियेनंतर सरीत अंथरलेल्या पट्टीवरील शेणखत- मातीच्या मिश्रणाच्या बेडवर कांडीवरील डोळ्याची बाजू वर करून कांड्या आडव्या ठेवल्या. बेणे लावल्यानंतर पट्टीच्या कडेने मातीत लहानशी चळी घेऊन ती माती बेण्यावर अंथरूण हलकासा दाब दिला. चळीमुळे पट्टीवर जादा झालेले पाणी निघून जाते. 
- बेणे लागवड पूर्ण झाल्यावर गरजेनुसार पाणी. चार दिवसांनी तणनाशकाचा वापर. बेण्याची उगवण 15 दिवसांत पूर्ण (पारंपरिक पद्धतीमध्ये 15 ते 25 दिवस लागतात). 
- रोपवाटिकेत बेणे लागवडीनंतर 20 व्या दिवशी युरिया सरीत विस्कटून दिला. 21 व्या दिवशी 19ः19ः19 या विद्राव्य खताची फवारणी. क्‍लोरपायरिफॉस व त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी. 
- सुमारे 30 दिवसांत चार पानांची रोपे तयार झाली. पुनर्लागवडीच्या दिवशी कात्रीने रोपांची वरची निम्मी पाने कापली, यामुळे लागवडीनंतर रोपांचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. 

अशी केली रोपांची पुनर्लागवड - - नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुनर्लागवडीचे नियोजन 
- काढणीपूर्वी दोन दिवस आधी रोपांच्या सरीला पाणी दिले. पट्टीची दोन्ही टोके उचलल्याने रोपे आपोआप मातीतून वर आली. रोपे मातीसहित घमेल्यात भरून लागवडीच्या ठिकाणी नेली. 
- पुनर्लागवडीत एक मजूर दोन फूट अंतरावर चळी घेऊन दुसरा मजूर रोप व्यवस्थित लावून दाबून घेतो. 
- लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी हलके पाणी, चार दिवसांनी तणनाशकाचा वापर. 
- सध्या शेतात 100 टक्के रोपे चांगल्या प्रकारे रुजली. उसाला माती परीक्षणानुसार रासायनिक खते दिली आहेत. 

- गेल्या पाच वर्षांपासून पाटणे यांना एकरी सरासरी 80 टन उत्पादन मिळते. यंदाही या प्रयोगातून एकरी किमान 70 ते 75 टन उत्पादनाची खात्री आहे. ते म्हणतात, की पुढील वर्षी ऊस बेणे टंचाई जाणवणार आहे. पारंपरिक पद्धतीत एक एकर बेणे मळ्यापासून 15 ते 20 एकर क्षेत्र लागवड होते. माझ्या पद्धतीने याच क्षेत्रातून किमान 100 एकरांपर्यंत लागवड होऊ शकते. उपविभागीय कृषी अधिकारी कृष्णराव धुमाळ, पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मला मिळाले आहे. 


- पाटणे यांनी 30 गुंठे क्षेत्र निवडले असले तरी एकराच्या हिशेबाने सहा हजार रोपे तयार केली. 
त्यासाठी रासायनिक खतांची मोकळी पोती (60 नग) - 150 रुपये, एक डोळ्याच्या सहा हजार कांड्या - 2400 रु., बेणेप्रक्रिया साहित्य, लावण, तणनाशक, खते, कीडनाशके, ऊस तोडणी, वाहतूक, कांडी करणे, बेणेप्रक्रिया असा एकूण 4200 रुपये खर्च आला. हा हिशेब पाहता प्रति रोप निर्मिती खर्च 70 पैसे येतो. बाजारात सध्या प्रति रोप अडीच ते साडेतीन रुपयांनी विकले जाते. ऊस तोडणी, वाहतूक, कांडी करणे, बेणेप्रक्रिया ही शेतकरी गटाच्या माध्यमातून केल्याने खर्चात बचत झाली. 

पाटणे यांच्या उसाच्या रोपवाटिकेसाठी कोकोपीट, ट्रे, रोप वाहतुकीचा खर्च नाही. आमच्या संशोधन केंद्रावरही अशा पद्धतीने रोपेनिर्मिती करून केलेल्या ऊस लागवडीचे निष्कर्ष चांगले आहेत. शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने रोपवाटिका करून खर्चात बचत करावी. 
- डॉ. सुरेश पवार, 
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा 

संपर्क - शेखर पाटणे - 9423968228, 9765090927

Monday, April 29, 2013

ऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे

दर्जेदार ऊस उत्पादनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी ऊस रोपवाटिका व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून पूरक उत्पन्न मिळवण्याची संधी त्यांनी शोधलीच, शिवाय रोपांचा उपयोग करणाऱ्या ग्राहक शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळू लागला आहे. 
राजेंद्र घोरपडे 

कोल्हापूर जिल्ह्यात चिंचवाड (ता. करवीर) येथील संदीप पाटील यांचे दोन एकर शेत पंचगंगा नदीच्या पूरक्षेत्रात आहे. दरवर्षी उसाचे शेत पुरात बुडते. सन 1995 मध्ये पुराचे पाणी जास्त दिवस राहून संपूर्ण ऊस कुजला. पुन्हा लावण करण्याची वेळ आली. पूर ओसरल्यानंतर किंवा भात पिकानंतर रोपवाटिकेद्वारे रोपांची लावण करायची, असे निवृत्त प्राध्यापक डॉ. के. एम. पोळ यांनी सुचविले. त्यानुसार संदीप प्लास्टिकच्या पिशवीत रोपे तयार करून लावण करू लागले. उगवण चांगली होत असल्याचे पाहून परिसरातील शेतकरीही रोपांची मागणी करू लागले. उगवण न झालेल्या रिकाम्या जागी रोप लावण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. यातूनच संदीप यांच्या रोपवाटिका व्यवसायाचा जन्म झाला. त्यांना वडील शांतिनाथ व ज्येष्ठ बंधू सचिन पाटील यांचीही मदत होते. 

भाड्याच्या जागेत रोपवाटिका - 
रोपांची मागणी वाढू लागल्याने रोपवाटिकेसाठी क्षेत्र कमी पडू लागले. यासाठी महिन्याला 1500 रुपये भाड्याने दीड एकर क्षेत्र घेतले. गेली सहा वर्षे याच जागेत ते रोपवाटिका करतात. सुमारे 13 महिला कामगार त्यांच्याकडे आहेत. वर्षाला पाच लाख रोपे तयार करतात. दोन ते अडीच रुपये प्रति रोप अशी विक्री होते. त्यातून सुमारे दहा लाख रुपये मिळतात. रोपवाटिकेचा साडेआठ लाख रुपये खर्च वजा जाता दोन - अडीच लाख रुपये निव्वळ नफा मिळतो. 

बियाणे प्लॉट नियोजन - 
फुले 265, को 86032, 99010, 99004 या जातींची रोपे संदीप तयार करतात. बियाणे कृषी विभागाकडून खरेदी करतात. पंधरा गुंठ्यांत चार प्लॉट करून त्यात ठराविक दिवसांच्या अंतराने कांड्यांची लागवड केली जाते. एकावेळी सुमारे तीन टन उसाची तोड होते. त्यापासून 12 ते 15 हजार रोपे आठवड्यात तयार केली जातात. प्लास्टिकच्या पिशवीत गाळाची माती, गांडूळ खत, जिवाणू खते (पीएसबी, ऍझोटोबॅक्‍टर) आदींचे मिश्रण भरून त्यात एक डोळा पद्धतीने लावण होते. कृषी विभागाने अधिकृत जाहीर केलेली जिवाणू खतेच ते वापरतात. एका वर्षी अनधिकृत जिवाणू खते वापरल्याने दीड लाख रोपे खराब झाली होती. सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. रोपांच्या उगवणीसाठी कोकोपीट वापरल्यास 35 दिवसांच्या आत लावण करावी लागते, अन्यथा ती पिवळी पडतात, वाढीची ताकद कमी होते. यासाठीच गाळाच्या मातीत प्लास्टिक पिशवीत रोपे तयार करतात. 

रोपवाटिका खर्च - (अंदाजे) 
रोपवाटिकेच्या अर्धा एकर क्षेत्राचे भाडे (महिन्याला 1500 रु.) - अठरा हजार 
माती, शेणखत (60 ते 70 गाडी) - 850 रुपये प्रति गाडी - 50 हजार 
सव्वा टन प्लास्टिक पिशवी (100 रुपये किलोप्रमाणे) - 1 लाख 20 हजार 
वर्षाला 70 टन बियाणे (तीन हजार रुपये टनाप्रमाणे) - दोन लाख दहा हजार 
वीज, पाण्यासाठी वार्षिक - 30 हजार 
मजूर (वार्षिक) - चार लाख 
जिवाणू खते, अन्य निविष्ठा - दहा हजार 
एकूण खर्च - साडेआठ लाख रुपये 
रोपांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न - दहा ते बारा लाख रु. 

रोपांना इतर जिल्ह्यांतूनही मागणी 
गेली दहा वर्षे रोपवाटिका व्यवसायात आहेत. पुणे, वैभववाडी, जत, जिल्ह्यातील राधानगरी, करवीर तालुक्‍यातील शेतकरी नोंदणीद्वारे रोपे नेतात. तालुका कृषी अधिकारी डी. बी. पाटील, कृषी सल्लागार ए. आर. पाटील आदींचे मोलाचे सहकार्य संदीप यांना लाभले आहे. 

संदीप पाटील - 9271700909 

माळ्याची नोकरी सोडून उभारली रोपवाटिका 
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील कृषी विद्यालयात सत्यजित शिंदे माळी म्हणून सात वर्षे कार्यरत होते. नोकरीत कायम न केल्याने मनात रुखरुख होती. अखेर नोकरी सोडून तळसंदे येथे स्वतःच्या शेतीत 2009 मध्ये रोपवाटिका सुरू केली. वडील सुरेंद्र धोंडिराम शिंदे माजी सैनिक होते, त्यांनी रोपवाटिकेसाठी अर्थसाहाय्य केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडून को 86032 जातीचे बियाणे आणले. सुरवातीला दहा हजार रोपे तयार केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कमी खर्चात चांगल्या प्रतीची रोपे तयार करून विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते दरवर्षी बेणे खरेदी करतात. पहिल्या वर्षीच्या बियाण्यापासून रोपे तयार केल्यास त्यांची वाढ उत्तम होत नाही, वजन कमी भरते. यामुळेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षीचे बेणे रोपे तयार करण्यासाठी वापरतात. 

रोपांसाठीचे व्यवस्थापन 
दिवसाला दोन हजार, तर महिन्याला सुमारे 30 हजार रोपेनिर्मितीचे उद्दिष्ट असते. दरवर्षी एक ते दीड लाख रोपे तयार करतात. को 86032, फुले 265 आदी जातींच्या बेण्यांची 20-20 गुंठ्यांवर लागवड होते. एक रोप तयार करण्यासाठी दीड ते पावणेदोन रुपये खर्च येतो. दोन ते अडीच रुपये प्रति रोप याप्रमाणे विक्री होते. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये अधिक मागणी असते. सातारा, गोटखिंडी, उदगाव, आष्टा, तसेच परिसरातील शेतकरी रोपांची खरेदी करतात. आगावू नोंदणी करावी लागते. 
- सत्यजित शिंदे - 9158982042 

आधुनिक पद्धतीकडे भीमरावांचा ओढा 
वारणानगरचे भीमराव केकरे पाच लाख रुपये खर्चून उभारलेल्या शेडनेटमध्ये दररोज अडीच ते तीन हजार रोपांची निर्मिती करतात. आधुनिक पद्धतीने रोपनिर्मिती असल्याने मागणी अधिक आहे. दिवसाला तीन हजार रोपांच्या निर्मितीसाठी सुमारे 100 प्लास्टिक ट्रे लागतात. त्यासाठी लागणारे कोकोपीट आंध्र प्रदेशातून खरेदी करावे लागते. दिवसाला दहा पोती लागतात. 10 ते 13 कामगार दररोज त्यांच्याकडे कामास आहेत. अडीच ते तीन हजार रोपेनिर्मितीसाठी सहा हजार रुपये दिवसाला खर्च येतो. अडीच रुपये दराने रोपांची विक्री केल्यानंतर खर्च वजा जाता अंदाजे दहा टक्के निव्वळ नफा मिळतो. 

भीमराव केकरे - संपर्क - 9552528632 

रोपवाटिकेचे फायदे 
- रोपवाटिकेतील रोपांची उगवण क्षमता चांगली असते. 
- बेणेप्रक्रिया केलेली असल्याने कीड - रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. 
- साखर कारखाना लावणीची नोंद दीड महिना अगोदर करून घेतो, यामुळे तोड वेळेवर होते. 
- थेट रोपांच्या लावणीमुळे दोन भांगलणी, खताची एक मात्रा यावरील खर्च वाचतो. 
- रोपांतील अंतर योग्य ठेवता आल्याने खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे होते. 
- पारंपरिक लावणीच्या तुलनेत उत्पादनात 20 ते 40 टक्के वाढ होते. 
- हंगामानुसार पाण्याच्या काही पाळ्या वाचतात. 
- रोपांमध्ये फुटव्यांची संख्या अधिक असते, त्यामुळे सरासरी उत्पादनात चांगली वाढ होते. 

रोपे वापरण्याचा फायदा झाला 
पूर्वी दोन डोळा पद्धतीने लावण करायचो. एकरी 40 टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. रोपवाटिकेतून रोपे विकत घेऊन लावण सुरू केली. आता 60 टनांपर्यंत उत्पादन मिळते. किडी - रोगांचा विशेषतः काणी, खोडअळीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आढळले. 
- रघुनाथ चव्हाण, तळसंदे 

माझे शेत पूरक्षेत्रात आहे, त्यामुळे कांडी लावणीनंतर अनेक ठिकाणी उगवण होत नाही किंवा पुराचे पाणी जास्त दिवस शेतात राहिल्यास उसाची मरतूक होते. या मोकळ्या जागा रोपांच्या लावणीतून भरून घेतो. खोडव्यामध्येही अनेक ठिकाणी उगवण न झाल्याने जागा रिकामी राहते. या ठिकाणीही रोपांची लागवड करण्यात येते. 
- दिलीप पांडुरंग पवार, कदमवाडी, जि. कोल्हापूर 

तज्ज्ञांचा कोट 
उसाची लावण करताना कांडी पायाने जमिनीत पेरतात. यामध्ये डोळा खराब होण्याचा, तसेच कांडी खोलवर गेल्याने उगवण न होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे 100 टक्के उगवण होत नाही. साहजिकच उत्पादनावर परिणाम होतो. याउलट रोप लागवडीत रोपांची संख्या योग्य ठेवली जाते. दोन रोपांतील अंतरही योग्य ठेवले जाते. खतांचा पुरवठा योग्य ठिकाणी होतो. यामुळे खते वाया जाण्याचा धोका टळतो. ठिबक सिंचन केल्यास फायदा वाढतो. रोपलावणीत योग्य व्यवस्थापनाची सांगड घालून उत्पादन वाढविणे शक्‍य आहे. 

- डी. एम. वीर, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर