Monday, September 30, 2013

आधी मार्केट शोधले शेतीतून फायद्याचे गणित साधले

38 गुंठे क्षेत्रात प्रत्येकी पाच गुंठ्यांत विविध पिके निवासी सोसायट्यांना मालाची थेट विक्री 
पुणे जिल्ह्यातील चिंबळी (ता. राजगुरुनगर) येथे सौ. सीमा जाधव आपल्या 38 गुंठे क्षेत्रातील शेतीची जबाबदारी सांभाळतात. यात प्रत्येकी पाच गुंठे क्षेत्रावर त्यांनी भाजीपाला व त्यातही परदेशी भाजीपाल्याची शेती केली आहे. आपल्या शेतीमालाला ग्राहकांची थेट बाजारपेठही मिळवली आहे. दिवसभर आपले वेळापत्रक व्यस्त ठेवून आपल्या शेतीच्या विकासासाठी अखंड झटणाऱ्या सीमाताई या समस्त शेतकरीवर्गासाठी आदर्शच म्हणायला हव्यात. 
सीमा जाधव यांचा विवाह चंद्रकांत जाधव यांच्याशी झाला तेव्हा घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांचे पती चाकण परिसरातील कंपनीमध्ये तात्पुरत्या नोकरीवर कार्यरत होते. त्यांच्या अल्पशा पगारावर घरचा उदरनिर्वाह होत नव्हता. आपणही हातभार लावावा म्हणून तीन एकर खडकाळ, मुरमाड, उताराच्या व पडीक जमिनीवर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यातील 38 गुंठे जमीन ट्रॅक्‍टर मजुरांच्या साहाय्याने लागवडीयोग्य केली. सुरवातीला वांगी, मिरची व पालेभाज्या घेण्यास सुरवात केली. त्याची विक्री चाकण व भोसरी मार्केट येथे सुरू केली. वाहतुकीला 400 रुपये भाडे द्यावे लागे. भाजीपाल्याची तोडणी, खुरपणी, फवारणी, कीडनाशके यावर मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा. हाती नफा फारच कमी लागे. त्याच वेळी परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांशी त्यांचा संपर्क आला. त्यांच्याकडून तीन दिवसांचे भाजीपाला लागवड ते विक्रीपर्यंत प्रशिक्षण मार्गदर्शन घेतले. 

परदेशी भाजीपाल्याची सुरवात -- बाजारपेठेचा अभ्यास करून परदेशी भाजीपाला पिकवण्यावर भर दिला. बियाणे खरेदी करून आणून त्यांची रोपवाटिका तयार केली. स्वतः तयार केलेल्या रोपांची लागवड सुरू केली. यामध्ये गादीवाफा पद्धतीचा वापर केला. 

शेतीतील नियोजन पाणी - शेतात पाण्याच्या सुविधेसाठी एक बोअरवेल घेतला. सध्या त्याला चांगल्या प्रमाणात पाणी आहे. मात्र, त्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही हे ओळखून त्याचा संचही शेतात बसवला, त्यासाठी 40 हजार रुपयांपर्यंत खर्च आला. बेडवरती ठिबकसह पॉलिमल्चिंग पेपरचा वापर केला. मल्चिंगमुळे खुरपणीचा त्रास कमी झाला. पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत झाली. पिकांना दररोज अर्धा तास ठिबकने पाणी दिले जाते. 

पोषण, पीक संरक्षण व्यवस्थापन - सीमाताई सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवतात. त्यामध्ये गांडूळ खत, नीम पेड, करंज पेड यांचा वापर होतो. करंज पेंडीची खरेदी पिरंगुट, तर निमपेंड चाकण येथून आणली जाते. किडींच्या नियंत्रणासाठी गोमूत्र, निंबोळी अर्क आदींचा वापर होतो. 

सुमारे 38 गुंठे क्षेत्रातील पिकांचे नियोजन - प्रत्येक पीक सुमारे पाच गुंठे क्षेत्रात 
- ब्रोकोली, लाल कोबी, लीक, आईसबर्ग, चेरी टोमॅटो, लाल कोबी, ढोबळी मिरची, वांगी, कारली, काकडी आदी पिके मागणीनुसार वर्षभर क्षेत्र बदलून घेतली जातात 
- मागणीप्रमाणे ताजा व चांगला भाजीपाला पुरवला जातो 

सध्या मिळत असलेले दर (रुपये प्रति किलो) रेड कॅबेज - 40 ते 50 रुपये, कमाल 70 ते 80 
ब्रोकोली - 40 ते 70 रुपये, कमाल 120 
चायनीज कॅबेज - 40 ते 70 रुपये 
लीक - 60, बहुतांशी पुणे मार्केटला माल जातो. 
आईसबर्ग - 65 ते 70 रुपये 
ढोबळी मिरची - 40 रुपये 
साधी मिरची - 30 ते 40 रुपये 
(ऋतूंप्रमाणे दरांत चढ-उतार होतात) 

प्रति दिन जमा-खर्च - - दररोज सुमारे 100 किलो भाजीपाला विक्री 
- मिळणारी एकूण रक्कम -- 1500 रु. 
वाहतूक, पॅकिंग, मजुरीवर होणारा खर्च -- 500 रु. 
रोजचे निव्वळ उत्पादन सुमारे - 1000 रु. 

सीमाताईंकडून काय शिकावे? - शेतात वेगवेगळे प्रयोग करण्याची वृत्ती 
- एकच पीक न घेता कमी जागेत, कमी वेळेत पाच ते सहा पिके घेऊन अधिक फायदा मिळविणे 
- बांधावर लिंबू, आंबा, चिकू घेणे 
- ग्राहकांना ताजा भाजीपाला कसा पुरवठा करता येईल याकडे विशेष लक्ष 
- व्यापाऱ्यांशी चर्चा करून कोणत्या भाजीला, कोणत्या हंगामात अधिक मागणी असते याची माहिती घेणे 
- शेतातील माती व पाणी परीक्षण करून घेतले आहे, त्यानुसार शेतीतील नियोजन केले जाते 

शेतात रासायनिक खते वा कीडनाशके यांचा जराही वापर नाही, सेंद्रिय पद्धतीनेच शेती केली जाते. 

शेतीतील उत्पन्नातून मालाच्या वाहतुकीसाठी पीक-अप व्हॅन, तसेच स्कॉर्पिओ व्हॅनही घेतली आहे. 

सुमारे 20 शेतकऱ्यांचा गट तयार केला आहे, त्यामाध्यमातून ग्राहक विस्तार करण्याचे उद्दिष्ट. 

सध्या काही गुंठ्यांवर पॉलिहाऊस उभारले आहे, त्यात ढोबळी मिरची, काकडी घेतली जात आहे. 

मुरमाड जमिनीत सीमाताईंनी फुलविलेली शेती पाहण्यासाठी राज्यातील तसेच आंध्र प्रदेश, गुजरात, तमिळनाडू येथील असंख्य शेतकऱ्यांनी चिंबळीला भेट दिली आहे, त्यांना महाराष्ट्र सिंचन सहयोगच्या वतीने उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 

कशी मिळवली थेट बाजारपेठ? सुरुवातीला कोरुगेटेड बॉक्‍समधून पुणे मार्केटला मालाची विक्री व्हायची; मात्र व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या कमी दरामुळे ग्राहकांना थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला. परदेशी भाजीपाल्याचा आस्वाद घेणारा ग्राहक उच्चभ्रू वर्ग आहे हे लक्षात आल्यानंतर सीमाताईंनी भोसरी परिसरातील एका मोठ्या सोसायटीत सर्व्हे केला. तेथील महिलांची बैठक घेऊन त्यांना आपला उद्देश समजावून दिला. त्यानंतर सामंजस्यातून थेट विक्रीची सुरवात झाली. 
फ्लॅटधारक फोनवरच भाजीपाल्याची मागणी नोंदवतात. त्यानुसार भाजीपाल्याची काढणी करून मालपुरवठा होतो. 

परदेशी भाजीपाला शेतीचा अनुभव - - ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा केल्यास ही शेती फायद्याची 
- थेट ग्राहकांना विक्री, त्यामुळे चांगल्या दराची खात्री 
- मार्केटिंग योग्य प्रकारे आवश्‍यक 
- लागवडीमध्ये कायम सातत्य आवश्‍यक 

आलेल्या अडचणी - - परदेशी भाजीपाल्याचे बियाणे लवकर उपलब्ध होत नाही 
- मार्गदर्शनासाठी अनुभवी व्यक्तींची कमतरता 
- मजूर समस्या भेडसावते, त्यामुळे काही वेळेस अधिक मजुरीही द्यावी लागते 

पाळलेली पथ्ये - - ग्राहकांच्या मागणीप्रमाणे मालपुरवठा करण्याचे तंत्र आत्मसात केले 
- लागवडीपासून विक्रीपर्यंतची सविस्तर माहिती घेतली 
 
सीमाताईंचा दिनक्रम - पहाटे पाचच्या सुमारास उठणे 
- सकाळची कामे व स्वयंपाक बनवणे 
- सकाळी सहा वाजता मुलाला शाळेत सोडणे 
- सकाळी साडेसातच्या सुमारास शेतात जाणे, तेथील नियोजन 
- दुपारी एकच्या दरम्यान घरी येणे, जेवण 
- दुपारी चारच्या सुमारास शेतात जाणे, मालतोडणी 
- त्यानंतर पीक-अप व्हॅनमध्ये माल भरणे 
- भोसरी येथील सोसायट्यांमध्ये महिला सहायकासोबत जाणे 
- आदल्या दिवशी बुकिंग घेतलेल्या घरांमध्ये भाजीपाल्यांच्या बॅगा प्रत्यक्ष पुरवणे 
- विक्रीचे सर्व काम आटोपून रात्री आठच्या सुमारास घरी येणे 
- त्यानंतर स्वयंपाक तयार करणे 
- त्यानंतर जेवण, घरातील आवराआवर व झोप 

याशिवाय नेहमी असणारी कामे - मुलांचा अभ्यास घेणे 
- दररोज फोनवरून ग्राहकांच्या भाजीपाल्याच्या ऑर्डर घेणे 
- शेतात फवारणी करणे 
- बियाणे आणून स्वतः रोपे तयार करणे 
- शेतीविषयक प्रशिक्षण घेणे 

सीमा जाधव - 9552727970 
मु.पो. चिंबळी, जि. पुणे

नेटशेतीत पिकवली ढोबळी मिरची

येवला तालुक्यातील शेतकरीही आता हायटेक शेती करू लागले आहेत. कृषी खात्याच्या मदतीने पॉलीहाऊस अर्थातच नेट शेतीचा वापर करत येवल्यातील पिंपळगाव जलाल येथील शामराव खोकले यांनी दीड एकर शेतीत ढोबळी मिरची लागवड करून यशस्वी उत्पादन घेतले आहे.

येवला तालुका हा तसा दुष्काळी तालुका त्यामुळे येथील शेतकरी पारंपरिक शेतीच आजपर्यंत करत आले. मात्र आता कृषी विभागाच्या मदतीने येथील शेतकरी हळूहळू इतर पिके घेण्याकडे वळू लागले आहेत. शामराव खोकले यांनी आपल्या दीड एकर जमिनीवर पॉलीहाऊसची उभारणी केली. त्यात त्यांनी बॅलाडिन जातीची ढोबळी मिरचीची वरंभा पद्धतीने लागवड केली असून त्यात ते यशस्वीही ठरले आहेत. 

या शेतीत त्यांनी दीड फूट अंतरावर मिरचीची हजार रोपांची लागवड फेब्रुवारीला केली. वरंभा पद्धतीने लागवड करते वेळी पाच ट्रेलर शेणखत त्यांनी दिले, त्यासाठी तेरा हजार रुपये एवढा खर्च आला. पॉलीहाऊस उभारणीस साडेचार ते पाच लाख रुपये खर्च केले. तर पाणी देण्यासाठी ठिबकसिंचनाचा वापर करून त्यांनी डी.पी.ए खत वापरले. पॉलीहाऊसमध्ये रोपांचा तीव्र सूर्यप्रकाशापासून बचाव झाल्याने रोपांची वाढही योग्य झाली. या सर्व गोष्टी काळजीपूर्वक केल्याने थोड्याच दिवसात त्यांना उत्पादन मिळू लागले व योग्य देखभालीमुळे एका झाडाला २५० ते ३०० ग्रॅम वजनाची ढोबळी मिरची त्यांना मिळू लागली. या उत्पादनापासून दहा ते बारा हजार रूपये त्यांना रोज मिळतात. पॉलीहाऊस, फवारणी, खत यांचा ५ ते ६ लाख रुपये खर्च वजा जाता त्यांना या हायटेक शेतीतून तीन लाख रूपये नफा मिळणार असल्याचे शामराव खोकले सांगतात. 

येवला तालुक्यातील या हायटेक शेतीबाबत तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर हेही भरभरून बोलतात. तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आधुनिक पद्धतीच्या शेतीचा फायदा घ्यावा यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून काहींनी केलेले प्रयोग आतापर्यंत यशस्वी ठरले आहेत. यापुढेही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आधुनिक तंत्राचा वापर केल्यास त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल, असे कुळधर यांनी सांगितले. हायटेक शेतीसाठी लागणाऱ्या कर्ज पुरवठ्यासाठी बॅंकांचे अधिकारी आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडे जाऊ लागले असून शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रे, निकष, अटींची पूर्तता केल्यास त्यांना पंधरा दिवसात कर्ज दिले जाते.

उत्पादनाचे लक्ष्य गाठून जयवंत झाले शेतीत यशवंत

सांगली जिल्ह्यातील रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील जयवंत मोरे यांनी पीक बदल करून त्यातून सोनेरी प्रगती साधली आहे. सोयाबीनऐवजी बटाटा, उसात कांदा, त्यानंतर कलिंगड वा ढोबळी मिरची आदी विविध पिकांच्या प्रयोगांतून मोरे यांनी प्रयोगशील वृत्ती जोपासली आहे. कष्टाला अभ्यास, नियोजनाची जोड देत मोरे यांनी बदलत्या शेतीचा वेध घेत व पीक उत्पादनाचे लक्ष्य ठेवीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
नोकरीच्या मागे लागलेली तरुणाई असे चित्र दिसणाऱ्या सध्याच्या काळात शेती क्षेत्र निवडून त्यात करिअर करणे विशेष बाब आहे. रेठरे हरणाक्ष येथील जयवंत मोरे यांनी इचलकरंजी येथून टेक्‍स्टाईल इंजिनिअरची पदवी घेतली. चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती. परंतु घरच्या शेतीतच राबण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या एकरी शंभर टन ऊस उत्पादन योजनेत सहभागी होऊन त्यांनी उसाचे उत्पादन वाढवले आहे. त्यातून एकरी सरासरी 40 टन उत्पादन त्यांनी 75, 80, 90 अशा टप्प्याने दहा वर्षांच्या प्रयत्नांतून शंभर टनांवर नेले. उत्पादन वाढवताना जमिनीचा पोत चांगला राहावा व आर्थिक उत्पन्नही वाढावे यासाठी पीक पद्धतीत त्यांनी सतत बदल केला.
…असा करतात पीकबदल
मोरे पूर्वहंगामी उसाची (को-86032, फुले-265) लागवड करतात. त्याआधी ताग, धैंचा ही हिरवळीची पिके घेतात. गेल्या वर्षी त्यांनी सोयाबीनसाठी शेत तयार केले. मात्र सोयाबीनच्या दराचा विचार केला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी-पुणे) येथील माजी शास्त्रज्ञ ए. एन. साळुंखे यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोयाबीनच्या ऐवजी बटाटा लागवडीचा निर्धार केला. बटाटा हे पीक या भागात प्रथमच केले जाणार होते. निमसोड येथून खासगी कंपनीकडून बियाणे खरेदी केले. कंपनीच्या नियमानुसार करारपत्र भरून दिले. त्यामध्ये उत्पादित केलेला बटाटा प्रति किलो दहा रुपये दराने कंपनी विकत घेणार होती. (बाजारात त्या वेळी सात ते आठ रुपये दर बटाट्याला होता) बटाटा लागवड करताना साडेचार फुटाची सरी सोडून गादीवाफे तयार केले. त्यावर सहा इंच अंतरावर बेणेप्रक्रिया करून बटाटा टोकला. या शेतात आधी सबसरफेस पद्धतीचे ठिबक केले होते. बटाट्यासाठी बेसल डोस म्हणून 10-26-26 च्या तीन बॅग, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय खत पाच बॅगा यांचा वापर केला. ठिबक सिंचनातून 12:61:0, 0:52:34, 0:0:50 ही खते गरजेप्रमाणे दिली. चांगल्या वातावरणामुळे बटाट्याचे पीक चांगले फोफावले. बटाटा पिकात करपा रोगाचा मुख्य प्रादुर्भाव असतो. त्याच्या नियंत्रणासाठी अधिक भर दिला. बटाटा पीक परिसरात प्रथमच असल्याने त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. बटाटा काढणीयोग्य झाल्यानंतर बैलांच्या अवजाराने काढणी केली. एकरी सुमारे आठ टन उत्पादन झाले. कंपनी कराराप्रमाणे 10 रुपये प्रति किलो दराने विक्री झाली. त्यावर प्रति किलो अडीच रुपये बोनस मिळाला. सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न सुमारे 80 दिवसांत मिळाले. खर्च वजा जाता 59 हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या बटाट्यावर कंपनी प्रक्रिया करून चीप्ससारखे उत्पादन तयार करते. बटाट्याच्या तुलनेत सोयाबीन खर्च एकूण 13,100 रुपयांपर्यंत येतो. प्रति एकर सरासरी 12 क्विंटल उत्पादन मिळते. गेल्या तीन वर्षांमधील दर पाहिला तर तो दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे. उत्पन्न 24 हजार रुपये धरल्यास खर्च वजा जाता 11,900 रुपये इतके उत्पन्न मिळते. त्या तुलनेत बटाट्याचे आंतरपीक फायदेशीर ठरल्याचे मोरे यांनी सांगितले.
ऊस व कांद्याचे आंतरपीक मोरे यांनी त्यानंतर उसात कांदा ही आंतरपीक पद्धती वापरली. बटाटा पिकानंतर उसाची रोपवाटिका केली. एक डोळ्याच्या उसाची रोपे लावली. बटाट्याच्या जागी गादीवाफ्यावर कांदा लावला. आंतरपीक कांद्याचे पाच एकरात 35 टन उत्पादन मिळाले. सहा ते आठ रुपये किलोला दर मिळाला. ऊस लागवडीचा बहुतांश खर्च त्यातून निघाला. पिकाचे उर्वरित अवशेष उसाच्या मुळाशी बुजवून टाकले. त्याचा उसाला चांगला फायदा झाला.
यांत्रिकीकरण व ठिबक मोरे यांनी काळाची गरज ओळखून 40 एकर शेतीवर पूर्णपणे ठिबक केले आहे. त्यातील 15 एकर क्षेत्रावर सबसरफेस पद्धतीचे ठिबक आहे. यांत्रिकीकरणाला प्राधान्य देताना पालाकुट्टी करण्याचे यंत्र तयार केले आहे. त्याचबरोबर खोडकी तासणे, बगला फोडणे आदी कामे करणारे यंत्र त्यांच्या भावाने विकसित केले आहे. त्याच्या साहाय्याने कामे केली जातात.
पीक पद्धतीतील बदल ठरला महत्त्वाचा मोरे यांनी सतत नवनवीन पिके घेण्याचा प्रयोग केला. त्यातून पूर्वी हळद, आले घेतले. खोडवा गेल्यानंतर नगदी पिके करण्याचे त्यांचे नियोजन असते. थोडक्‍यात, ही पिके बोनस म्हणून घेतात. त्यांनी अशाच पद्धतीने तीन एकरात कलिंगड घेतले. त्यातून एकरी किमान 20 टन उत्पादन घेतले. सध्या पावणेतीन एकरावर ढोबळी मिरची आहे. अडीच एकरात दीडशे टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 15 टन विक्री झाली असून किलोला 22 रुपये दर मिळत आहे. कोलकत्याचे व्यापारी जागेवरून माल नेत आहेत. पुणे, सातारा, मुंबई या ठिकाणी मालाची विक्री केली. मॉलसाठीही मालाला मागणी आहे. उन्हाळ्यात मिरचीचे पीक सुकून जाऊ नये म्हणून साडीचे शेड उभारून त्यात मिरची जगवली. ऐनवेळचा गरजेनुसार घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरला. अन्य शेतकऱ्यांचे प्लॉट वाळून गेले तेथे मोरे यांचा प्लॉट चांगल्या अवस्थेत होता.
मोरे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये
* चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळले.
* गेली दहा वर्षे पालाकुट्टी व पाचट कुजवून त्याचा शेतात वापर करतात.
* संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचनाने पाणी देतात.
* यांत्रिकीकरणावर भर. गरजेनुसार विविध यंत्रे भावाच्या साह्याने बनवली.
* एकरी शंभर टन ऊस उत्पादनासाठी नेहमी धडपड. त्यात यशही मिळाले.
खोडव्याचेही एकरी 70 ते 80 टनांपर्यंत उत्पादन
- नेहमी शिकण्याची वृत्ती. शास्त्रज्ञांचे सतत मार्गदर्शन घेतात.
- पिकांचा सविस्तर अभ्यास करून दर्जेदार, कमाल आणि लक्ष्य ठरवून उत्पादनाचे प्रयत्न
- परिसरात जी पिके होत नाहीत ती घेण्यावर अधिक भर
परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक झाले आहेत. कृषी मंडळाची स्थापना.